मॉस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारो लोक एकत्र जमले होते. यावेळी सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जागीच ठार झाले. हे हल्लेखोर तब्बल १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते.
मॉस्को, दि. २४ : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रॉकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या १३३ वर पोहोचली. इस्लामिक स्टेट ग्रुपने (इसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याप्रकरणी ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मॉस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारो लोक एकत्र जमले होते. यावेळी सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जागीच ठार झाले. हे हल्लेखोर तब्बल १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते. यानंतर अचानक कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागली आणि स्फोटांचा आवाज झाला. यामध्ये ११५ पेक्षा अधिक जण ठार झाले. पुतिन पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर काही दिवसांतच हा हल्ला झाला. इसिसच्या अफगाणिस्तानमधील शाखेने रशियात हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती आम्ही रशियाला दिली होती, असे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. रशियन रॉक बँडचा कार्यक्रम ऐकण्यासाठी क्रॉकस सिटी हॉलमध्ये शेकडो प्रेक्षक उपस्थित होते. सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार सुरू करताच प्रेक्षक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावू लागले. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. हल्लेखोरांनी प्रेक्षकांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर लागलेल्या आगीत हॉलची बाल्कनीही कोसळली. मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला झाल्यानंतर रशियन प्रशासन अलर्ट आले असून विमानतळ, रेल्वे स्थानके आणि विविध शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तर मॉस्को शहराच्या महापौरांनी सर्व कार्यक्रम रद्द केले असून शहरातील सिनेमागृह आणि संग्रहालये दोन दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली.