१९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील एकाही उमेदवाराची घोषणा अजूनही झालेली नाही.
दिल्ली, दि. २२ : काँग्रेसकडून सात राज्यांतील ५७ उमेदवारांची तिसरी यादी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ७ उमेदवारांचा यात समावेश आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून ॲड. गोवाल के. पाडवी, लातूरमधून शिवाजी कलगे, नांदेडमधून वसंत चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यावर घटक पक्षांची सहमती होती. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघामध्ये २०१९ मध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले होते. मात्र शाहू महाराजांसाठी ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला सोडली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यासंदर्भातील अधिसूचनाही काढण्यात आली आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून २ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मात्र १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील एकाही उमेदवाराची घोषणा अजूनही झालेली नाही. महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असून दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी स्पष्ट केले.