IMG-LOGO
लोकसभा २०२४

काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; गडकरी यांच्याविरोधात ठाकरे

Sunday, Mar 24
IMG

काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमुर, रामटेक या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

मुंबई, दि. २४ : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापर्यंत तीन यादी जाहीर केल्या होत्या. यातील तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आता काँग्रेसकडून देशभरातील ४६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ४ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमुर, रामटेक या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यात रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर मतदारसंघातून विकास ठाकरे निवडणूक लढणार आहे. तसेच गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना तिकीट मिळालं आहे. त्यासोबतच भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून, पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. तर २६ एप्रिल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार असून, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच तिसरा टप्पा हा ७ मे रोजी होणार असून, यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार असून, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच पाचवा टप्पा २० मे २०२४ रोजी पार पडणार असून, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.

Share: