भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्यानंच हे कटकारस्थान सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
मुंबई, दि. ०३ नोव्हेंबर : ११ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पण कांजूरमार्गची नियोजित जागा ही केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मेट्रो कारशेडसाठी राज्यानं प्रस्तावित केलेली कांजूरमार्गची जागा ही मिठागाराची असल्याचं पत्र केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलं आहे. आता यावर MVA सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने 2002 मध्ये मिठागाच्या अनेक जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आहेत. ही खासगी जमीन असल्याचा दावा यापूर्वी भाजपनेच केला होता आणि आता केंद्र सरकार त्यावर आपला दावा सांगत आहे. भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्यानंच हे कटकारस्थान सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. केंद्राचा हा दावा तपासून राज्य सरकार केंद्राला योग्य उत्तर देईल, असंही मलिक यांनी सांगितलं.