नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर चौकात उभ्या असलेल्या एका कारची पुढील काच फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 3 लाख 80 हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलीसांत अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारची काच फोडून चार लाख लंपासनाशिकरोड । दि. २६ नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर चौकात उभ्या असलेल्या एका कारची पुढील काच फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 3 लाख 80 हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलीसांत अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रेस कामगार नेते चंद्रकांत हिंगमिरे यांनी शुक्रवारी (दि. 25) येथील राष्ट्रीयकृत बँकेतून सुमारे 3 लाख 80 हजाराची रक्कम काढली. त्यानंतर हिंगमिरे यांनी ही रक्कम आपल्या मारूती युको (एमएच 15 सीएम 9536) या चारचाकी गाडीत पुढच्या सीटवर एका कापडी पिशवीत ठेवली. त्यानंतर काही कामानिमित्त त्यांना दत्तमंदिर चौकात जायचे असल्याने त्यांनी आपली गाडी जवळच असलेल्या सिग्नलवरील आर्चिस गॅलरी येथे एका झाडाखाली उभी केली. दरम्यान या संधीचा फायदा घेत हेल्मेट घातलेल्या एका अज्ञात चोरट्याने आपली दुचाकी बाजूला उभी करून झाडाच्या आडोशाचा फायदा घेत कारची पुढील काच दगडाने फोडली व सीटवर असलेली रक्कम ठेवलेली कापडी पिशवी लंपास केली. काही वेळानंतर हिंगमिरे हे काम आटोपून गाडीजवळ आले असता त्यांना गाडीची काच फुटलेली व सीटवरील रोकड रक्कम असलेली पिशवी गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता कोणाला याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर हिंगमिरे यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पुढील तपास वपोनि भारतकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि व्हि.एस. लोंढे हे करत आहेत. वर्दळीच्या भागात घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.