कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
मुंबई, दि. ०५ नोव्हेंबर : दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्वेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण कक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यूदर अधिक आहे त्या ठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडिटी कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ज्ञांनी संगितले.