मुख्यमंत्री वाय.एस.जगमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी दुःख व्यक्त केले आहे. तसेच तातडीने मदतकार्य करण्याचे आदेशही संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
हैदराबाद, दि. १४ फेब्रुवारी : आंध्र प्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात आज पहाटे साडेचार वाजता हैदराबाद-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात 14 जण ठार झाले. कुरनूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ बस आणि ट्रकची जोरादार धडक झाली. या अपघातातील जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या अपघातामधील मृतांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि आठ महिलांचा समावेश आहे. तसेच चार मुले वाचली असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातग्रस्त परिवार अजमेर दर्गाहला जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिनी बसमधून 18 जण प्रवास करत होते. यामध्ये तीन कुटुंबे होती. तीर्थयात्रेसाठी राजस्थान अजमेरच्या दिशेने मिनी बस जात होती; परंतु बस चालकाने झोप येत असताना वेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. भरधाव बस रस्तच्यावरील दुभाजकाला धडकून रस्त्याच्या विरुद्ध दिशेवर पलटली. विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत बसचा चुराडा झाला. बचावकार्य करताना बस कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. मुख्यमंत्री वाय.एस.जगमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी दुःख व्यक्त केले आहे. तसेच तातडीने मदतकार्य करण्याचे आदेशही संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत.