अनलॉकनंतर राज्यसरकारने लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरू केली होती. राज्य सरकारच्या विनंतीबाबत अजूनही रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतलेला नाही.
मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नसून रेल्वे मंत्रालयाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे.अनलॉकनंतर राज्यसरकारने लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरू केली होती. राज्य सरकारच्या विनंतीबाबत अजूनही रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतलेला नाही. पण, सामान्यांना पूर्वीसारखा मुंबईच्या लोकलमधून प्रवास करता येणार नाही. काही विशिष्ट वेळेमध्येच सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे."मुंबईच्या लोकल ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी सुरू कराव्यात या विनंतीचं पत्र आम्ही रेल्वे प्रशासनाला पाठवलं आहे. लोकल कशा पद्धतीनं चालवण्यात याव्यात याबाबतही आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे. अजून त्याचं त्यावर काही उत्तर आलेलं नाही," असं मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.