या तरुणीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 16 तरुणांना डेटिंग अॅपद्वारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडील दागिने लंपास केले.
पुणे, दि. ४ फेब्रुवारी : सोशल मीडियावरील अनेक डेटिंग अॅप गुन्हेगारांचा नवा अड्डा बनले आहेत. अशाच एका अॅपचा वापर करत पुण्यातील एका 27 वर्षीय तरुणीने तब्बल 16 युवकांना आपल्या जाळ्यात ओढून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 16 तरुणांना डेटिंग अॅपद्वारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडील दागिने लंपास केले. लुटल्या गेलेल्या एका तरुणाच्या लक्षात ही बाब आली आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दखल घेत तपासचक्र फिरवली; मात्र ही तरुणी अत्यंत चालाख होती. ज्या डेटिंग पीपीवरून ती तरुणांशी मैत्री करण्यासाठी ती स्वतःचे अकाउंट उघडायची, ते अकाउंट नंतर ती डिलीट करायची. त्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचायला पोलिसांना अडचण येत होती; मात्र या तपासाला आव्हान म्हणून स्वीकारणा-या पोलिसांनीही स्मार्ट गेम खेळला आणि ही तरुणी अलगद त्यांच्या जाळ्यात अडकली. पुण्यातील सधू वासवणी रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी आरोपी सायली काळेला जेव्हा पोलिसांनी अटक केली, तेव्हा तेही चक्रावले. कारण तिने ज्या सोळा तरुणांना लुटले होते, तो सगळा ऐवज तिच्याकडे सापडला. त्यात सोनसाखळ्या, अंगठ्या आणि महागड्या मोबाईलचा समावेश होता. सुमारे 15 लाखाहून अधिक किंमतीचा हा सगळा ऐवज पोलिसांनी आता जप्त केला आहे. डेटिंग अॅपचा फायदा घेत सायलीने ज्या 16 तरुणांना लुटले, त्यापैकी केवळ चारच जणांनी तिच्या विरोधात तक्रार दिली आहे. इतर तरुण आपली बेअब्रू होईल, या भीतीने अजून तरी तक्रार द्यायला धजावत नाहीत आणि नेमकी हीच अवस्था अशा गुन्ह्यात फसलेल्या अनेकांची होते. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे या निमित्ताने कळू शकेल.