मी आयुष्याची 40 वर्ष भाजपसाठी काम केलं. एकाएकी पक्ष सोडावा असं मला कधीच वाटलं नाही.
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर : गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं. खडसे म्हणाले की, मी आयुष्याची 40 वर्ष भाजपसाठी काम केलं. एकाएकी पक्ष सोडावा असं मला कधीच वाटलं नाही. विधानसभेत माझी खूप छळवणूक झाली, मानहानी झाली, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्वांना मी सभागृहात विचारयाचो की माझा गुन्हा काय? मी कोणता गैरव्यवहार केला असेल तर मला त्याची कागदपत्र दाखवा, परंतु या क्षणापर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला नसता तर माझ्यावर राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली असती. आता मला मार्गदर्शन करायला सांगणारे नेते चार दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. तुम्हाला पहाटे पाच वाजता शपथेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चांगला वाटला होता. तसाच तो मला आज चांगला वाटतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.