IMG-LOGO
महाराष्ट्र

प्रत्येक सासुरवासिणीला पोलिस स्टेशन हे माहेर वाटले पाहिजे – प्रताप दिघावकर

Sunday, Nov 01
IMG

नाशिक येथील पदाचा कार्यभार घेतल्यापासून सन 2013 पासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पाच कोटी रुपये मिळवून दिले.

जळगाव, दि. ०१ नोव्हेंबर : शासन पोलिसांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत आहे अशावेळी पोलिसांनीही प्रत्येक नागरिकाला चांगली वागणूक दिली पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक भगिनीला (सासुरवासिणीला) पोलिस स्टेशन हे तीचे माहेर आहे असे वाटले पाहिजे. पीडित, गोरगरीब, शेतकरी यांना न्याय देण्याची भूमिका पोलिसांनी निभावली पाहिजे असे सांगून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर म्हणाले की, नाशिक येथील पदाचा कार्यभार घेतल्यापासून सन 2013 पासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पाच कोटी रुपये मिळवून दिले असून अजून 661 व्यापारी बुडविलेले पैसे परत देणार आहे. त्याचबरोबर अमळनेर पोलीस स्टेशन हे शहराच्या बाहेर असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील पोलीस चौकीतच एफआयआर दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. दिघावकर यांनी यावेळी सांगितले. अमळनेर येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन व एरंडोल येथील पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले की, पोलिसांचा महत्त्वाचा विषय आज मार्गी लागत आहे, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाची निवासस्थाने उपलब्ध झाल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी अधिक जोमाने व उत्साहाने काम करतील अशी ग्वाही देऊन त्यांनी जिल्ह्यातील पोलीसांचे व पोलीस दलाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव व पोलीस निरिक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी तर उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी मानले. या कार्यक्रमास पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी  व त्यांचे कुटूंबिय तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share: