IMG-LOGO
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही, नारायण राणेंची टीका

Monday, Oct 26
IMG

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बेडकाची उपमा राणे आणि त्यांच्या दोन मुलांना दिली होती. यावर नारायण राणे भडकले असून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

मुंबई, दि.२६ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. एवढेच नव्हे तर हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होतं. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने कसं बोलावं, याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बेडकाची उपमा राणे आणि त्यांच्या दोन मुलांना दिली होती. यावर नारायण राणे भडकले असून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा राणे कुटुंबियांवर आरोप कराल तर गेल्या 39 वर्षांत शिवसेनेत जे काही पाहिले ते सारे बाहेर काढेन अशी धमकी दिली. बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धवना मुख्यमंत्री केले नसते.  कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ही मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी नाही का? पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी. कोणाला बेडूक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट असं नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे स्वत:ला वाघ म्हणवतात मात्र, ते कोणते वाघ आहेत? पिंजऱ्यातले की पिंजऱ्याच्या बाहेरचे? सीबीआयप्रकरणी पुत्राला स्वत:च क्लिनचीट दिली. स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत, मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे एक दिवस जेलमध्ये जाणार, असेही नारायण राणे म्हणाले.  हिंदूत्वावर बोलण्याची नैतिकता सेनेला नाही. निर्बुद्ध आणि शिवराळ भाषण काल मुख्यमंत्र्यांनी केलं. असं नारायण राणे म्हणाले. 

Share: