केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
कोल्हापूर, दि. ०२ नोव्हेंबर : एफआरपी थकवला तर साखर कारखाने बंद पाडणार असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरात १९ व्या उस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वाभिमानीने वेगवेगळे ठराव संमत केले. या उस परिषदेनंतर राजू शेट्टी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी यावेळी एकरकमी एफआरपी द्यावा असंही म्हटलं आहे. कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही १४ टक्के वाढीव एफआरपी द्यावा, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.