मनसेने २४ तासांत जान कुमार सानूने माफी मागितली नाहीतर बिग बॉसचे शूट बंद करु तसेच जान सानुला यापुढे काम कसे मिळते ते पाहू, असा इशारा दिला होता.
मुंबई, दि. २९ ऑक्टोबर : प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने 'मला मराठीची चीड येते', असे म्हणत 'मराठी' भाषेचा अपमान केला होता. यानंतर जानवर सर्व स्तरातून टीका होत होती. मनसेने जानला माफी मागणीसाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करुन देत त्यास नॅशनल टेलिव्हिजन वर माफी मागावी लागली आहे. 'मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही,' अशी ग्वाही जानने दिली आहे. मनसेने २४ तासांत जान कुमार सानूने माफी मागितली नाहीतर बिग बॉसचे शूट बंद करु तसेच जान सानुला यापुढे काम कसे मिळते ते पाहू, असा इशारा दिला होता. सानुला लवकरच थोबडवणार, अशी धमकी मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिली होती. दरम्यान बिग बॉसच्या १४ व्या हंगामात शोमधील स्पर्धक जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर निक्की तांबोळी आणि राहुल वैद्य मराठी भाषेत चर्चा करत होते. तेव्हा जानने त्यास विरोध दर्शवत, 'मला मराठी भाषेची चीड येते हिंमत असेल तर हिंदीत बोला,' असे म्हटले होते.