IMG-LOGO
महाराष्ट्र

बंद दाराआडचे सांगायला मी ज्योतिषी नाही

Sunday, Feb 07
IMG

अजूनही जीएसटीचे 35 हजार कोटी केंद्राकडून आलेले नाही. आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते, ते देत नसल्याचेही पवार म्हणाले.

अजित पवार यांचा टोला; शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकारनागपूर, दि. ७ फेब्रुवारी : भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती, तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला उत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दाराआड काय घडले, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा बराच काळ कोरोनाच्या संकटात गेला आहे. त्यामुळे विकास दर घटला असल्याची कबुली त्यांनी दिली. अजूनही जीएसटीचे 35 हजार कोटी केंद्राकडून आलेले नाही. आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते, ते देत नसल्याचेही पवार म्हणाले. निधीअभावी अनेक कामांना कात्री लावावी लागली. अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला; पण आता कोरोना हळूहळू कमी होतो आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोना काळात आर्थिक स्थिती कमकुवत झाली असताना काही महत्वाच्या विभागांचा आम्ही निधी कमी केला नाही. जिल्हा विकास निधीला कात्री लावली नाही. रियल इस्टेट क्षेत्रात आम्ही मुद्रांक शुल्क कमी केले, त्याला डिसेंबरपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. जानेवारीपासून तेवढी खरेदी नाही. केंद्रीय अर्थसंकल्पानंतरही बाजारात हवा तसा उठाव आला नाही; मात्र स्टील, सिमेंट, डांबराच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. या सर्व वस्तूंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढली आहे. सोबत डिझेल, पेट्रोल, घरघुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. काही काळात पेट्रोल नक्कीच शंभरी गाठेल, असे पवार म्हणाले.कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने करायला हवा अशी आमची अपेक्षा आहे; मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी त्याबद्दल वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. अजूनही बाजारातील अनेक सेवांना ग्राहकांचा हवा तेवढा प्रतिसाद नाही. हळूहळू भीती कमी होईल, त्यानंतर बाजारात तेजी येईल आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थसंकल्पाबद्दल सध्या काहीच बोलणार नाही. कारण ते सहकारी पक्ष आणि मुख्यमंत्र्यासोबत बोलून ठरवू. अर्थमंत्री म्हणून माझ्या मनात निश्चित  काही योजना आहेत, असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदांत चांगले निकाल अपेक्षितआम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय करतो, विसंवाद नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही भाजपपेक्षा बरेच पुढे राहिलो, येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Share: