IMG-LOGO
महाराष्ट्र

अर्णब यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Saturday, Feb 06
IMG

नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत आजही तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत दहा मार्चला होणा-या पुढील सुनावणीला या तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले.

अलिबाग, दि. ६ फेब्रुवारी  : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना अर्णबसह दोघांना दहा मार्चच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत अलिबाग न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना सक्त ताकीद दिली. त्यामुळे अणर्र्ब गोस्वामी यांना स्वतः न्यायालयात हजर होण्याची नामुष्की येणार आहे. नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत आजही तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत दहा मार्चला होणा-या पुढील सुनावणीला या तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णबसह इतरांना विनंती केली होती; मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून या कामासाठी माल घेतला होता, त्यांनीही पैशाचा तगादा लावला होताच पण कामाचे पैसे न मिळाल्याने अन्वय यांना नैराश्य आले. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. नाईक यांच्या कंपनीने अर्णब यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब यांनी पैसे थकवल्याने नाईक यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांनी केला आहे. अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी अर्णब, फिरोज, सरडा यांची नावे लिहिली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

Share: