IMG-LOGO
राष्ट्रीय

भाजप-संघाच्या बैठकीत उत्तर प्रदेशसाठी रणनीती

Monday, May 24
IMG

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

मोदी, शाह यांच्या उपस्थितीत बैठक; निवडणुकीची तयारी सुरूनवी दिल्ली, दि. २४  मे :  देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे आव्हान निर्माण झालेले असून, परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. विशेषतः उत्तर प्रदेशातील स्थिती गंभीर असून, गंगेत वाहून आलेल्या मृतदेहामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार टीकेचे धनी ठरले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात आले. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांची उपस्थिती होती.उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत; मात्र कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. विरोधकांकडूनच नाही, तर भाजपतील खासदार आणि नेत्यांकडून योगी सरकारवर टीका होत आहे. त्यातच अलिकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजपने सरकारची प्रतिमा चांगली करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याचे काम सुरू केले आहे. याच अनुषंगाने भाजप आणि संघाच्या नेत्याची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मोदी, शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनील बन्सल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेशात 2022मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीचा निवडणुकीवर होणार परिणाम आणि त्यावर मात करून पक्षाला पुन्हा पहिल्या नंबरवर ठेवण्यासाठी आखायच्या रणनीतीवर संघ आणि भाजपा नेत्यांची चर्चा झाली.काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात महत्त्वाच्या पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपला झटका बसला आहे. आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाने जोरदार टक्कर देत समान जागा मिळवल्या आहेत, तर मथुरा आणि इतर पंचायत समितीचे निकालही भाजपला चिंतन करायला लावणारे आहेत. भाजपचे खासदार, मंत्री आणि नेतेच योगी सरकारवर टीका करताना दिसून आले, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. पश्‍चिम बंगालमध्ये मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपने आता उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत प्रत्येक नेत्याने आपले मत मांडले. या बैठकीत उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या हाहा:कारामुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा, त्याचा निवडणुकीवर होऊ शकणारा परिणाम आदींवर चर्चा झाली. तसेच निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा कशी उंचावता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. बन्सल गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतच होते. ते सातत्याने दत्तात्रय होसबोले यांच्या संपर्कात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी बन्सल आणि होसबोले यांची बैठक पार पडली. त्यानंतर बन्सल नड्डांना भेटले. नंतर होसबोले, शाहा, नड्डा यांची मोदींशी चर्चा झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीतून लोकांचा भाजपवरील विश्‍वास उडाल्याचे दिसून आले आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.स्वयंसेवकांच्या फिडबॅकवर चर्चासंघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरणाबाबत जे फिडबॅक दिले, त्याची माहिती होसबोले यांनी बैठकीत दिली. तसेच भविष्यात भाजपची रणनीती काय असेल त्यावरही या वेळी चर्चा करण्यात आली. भाजप आणि संघ नेत्यांमध्ये अचानक झालेल्या या बैठकीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Share: