भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली.
नाशिक, दि. १४ फेब्रुवारी : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपची आध्यात्मिक आघाडी उद्या सोमवारी नाशिकच्या रामकुंडावर शंखनाद आंदोलन करणार आहे. या वेळी आध्यात्मिक आघाडीने वडेट्टीवार हे मनोरुग्ण असल्याची टीका केली.भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली. उद्या सकाळी साडेदहा वाजता रामकुंड, पंचवटी नाशिक येथे साधू-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलनाची घोषणा केली. या वेळी व्यासपीठावर भाजपचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते.साधूंचा अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही. वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. साधूंच्या वेशातल्या दोन-चार भोंदूंनी गैरवर्तन केले, म्हणून हिंदू समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करून साधना करत असलेल्या साधू परंपरेला अशा शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधू परंपरेचादेखील हा अपमान आहे. हिंदू विरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे, अशी टीका भोसले यांनी केली. हिंदू समाजाला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?, असा आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल आहे. 15 डिसेंबर 2020 रोजी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते, की हा महाराष्ट्र साधू-संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. मग, तुमचेच मंत्री आज साधूंना नालायक म्हणतात. हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का?, असा सवालही त्यांनी केला.रावणाला लाजवेल असे मंत्रिमंडळतुमचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात, शरजीलसारखे हिंदूंना शिव्या घालून जातात, आता तर तुमचे मंत्रीच साधूंना शिव्या देत आहेत. तुमचे असे मंत्रिमंडळ पाहून तर हे रावणाच्या मंत्रिमंडळाला लाजवेल, असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे, अशी टीकाही त्यांनी केली.