हरियाणातील हिसारमधील खरक पुनिया येथे आयोजित महापंचायतीत टिकैत यांनी हा इशारा दिला. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.
नवी दिल्ली, दि. १९ फेब्रवारी : केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी आज ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन केले. अनेक शेतक-यांची धरपकड झाली. दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतक-यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असेल, तर आगामी काळात आणखी 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत दाखल होतील, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. हरियाणातील हिसारमधील खरक पुनिया येथे आयोजित महापंचायतीत टिकैत यांनी हा इशारा दिला. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. मागील कित्येक दिवासांपासून दिल्लीच्या वेशींवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, किमान आधारभूत किमतीसंबंधी कायदा करावा, अशा मागण्या या शेतक-यांच्या आहेत. सरकारसोबत बैठका होऊनही शेतक-यांच्या या मागण्यांसंबंधी अद्याप सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अजूनही दिल्लीतील शेतक-यांचे आंदोलन सुरुच आहे. याविषयी टिकैत म्हणाले, की या लढ्यात शेतक-यांना बलिदान द्यावे लागेल. शेतकरी उभ्या पिकाला आग लावतील. शेतक-यांच्या पिकासंबंधीचा निर्णय हे शेतकरीच घेतील. यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. शेतकरी शेतात पीक घेतील तसेच ते आंदोलनही करतील. दरम्यान, किसान संयुक्त मोर्चाने आज देशभरात दुपारी 12 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रेल्वे रोको करण्याचे आवाहन केले होते. किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशात मोठ्या प्रमाणत रेल्वे अडवण्यात आल्या. 26 जानेवारीनंतर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. नांदेड जिल्ह्यातील किनवट रेल्वेस्थानकावर माकपाच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी शेतकर्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले. दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, बिहार आदी अनेक ठिकाणी आंदोलक शेतकर्यांना रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला असून, रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. संयुक्त किसान मोर्चाचे रेल रोको आंदोलन हरियाणात 80 ठिकाणी, पंजाबमध्ये 15 जिल्ह्यात 21 ठिकाणी झाले. रेवाडीच्या दिल्ली जयपूर रेल्वे मार्गावर हरियाणा, राजस्थान सीमेवरील अजर का जंक्शनजवळदेखील शेतक-यांनी ठिय्या दिला होता. पंजाबमध्ये किसान मजदूर संघर्ष कमिटीने रेल रोको आंदोलन करत अमृतसरमधील रेल्वे मार्ग रोखून धरला. बिहारमधील पाटणा येथे रेले रोको करण्यात आला. पप्पू यादव यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. बिहारमध्ये जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पटणा जंक्शन रेल्वे स्टेशनवर रेले रोको आंदोलन केले. जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी रेल रोको आंदोलन करण्यात आले.दिल्लीतील मेट्रो बंदया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोने चार स्टेशन्स बंद केले होते. याशिवाय दिल्लीतील नांगलोई रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.