IMG-LOGO
नाशिक शहर

नाशिकमधील प्लाझ्मा सेंटरला केंद्राची मान्यता

Monday, Aug 24
IMG

गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँक कक्षेत प्लाझ्मा निमिर्तीला सुरुवात केली होती.

नाशिक, दि. २४ ऑगस्ट  : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातले असून दिवसागणिक कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता कहर आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील जिल्हा रुग्णालयात अद्यावत प्लाझ्मा सेंटर उभारले आहे. काही दिवसांपासून सदर सेंटर केंद्रशासनाच्या मंजुरी प्रतिक्षेत होते. आज सेंटरला केंद्राने मंजुरी दिली असून लवकरच प्लाझ्मा सेंटर सुरु होणार आहे. या प्लाझ्मा सेंटरमुळे रुग्णांना यापुढे प्लाझ्मा उपलब्ध होणार असून यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सदर प्रस्तावित सेंटरला मान्यता मिळावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील होते.गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँक कक्षेत प्लाझ्मा निमिर्तीला सुरुवात केली होती. यासाठी राज्यशासनाकडून साधर सामुग्री उपलब्ध झालेली होती. मागील आठवड्यात ब्लड बँक कक्षेत प्लाझ्मा सेंटरच्या साधन सामुग्री बसविण्यात आली होती. मात्र केंद्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मंजुरीमुळे सेंटर सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होते. मागील आठवड्यात खासदार गोडसे यांनी दिल्ली येथे जात मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाची भेट घेतली होती. यावेळी खा. गोडसे यांनी प्लाझ्मा सेंटरचे महत्त्व प्रशासनाला पटवून दिले होते. प्लाझ्मा सेंटरचा मुद्दा भावल्याने अन्न व औषध प्रशासनाने आज जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरला मंजुरी दिली आहे. लवकरच आय. सी. एम. आर. च्या पुर्ततेनंतर हे प्लाझ्मा सेंटर प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब असावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याने खासदार गोडसे यांनी त्यांच्या खासदार निधीतून तब्बल एक कोटी रुपये उपलब्ध करुन देत नुकतीच नाशिक शहरात कोरोना टेस्टिंग लॅब उभारली आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान होवून रुग्णांवर उपचार करण्यासाठी गती आल्याने शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. लवकरच या प्लझ्मा सेंटरमुळे नाशिक कोरोनामुक्त होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास खासदार गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

Share: