काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटले आहे, की संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल.
मुंबई, दि. ३१ डिसेंबर : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचे स्वप्न सत्यात येणार असल्याचे दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक काँग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे. काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटले आहे, की संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारने सामान्य माणसाचे जीवन सुखी कसे होईल हे पाहायचे, हा किमान समान ककार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे .महाविकास आघाडीच्या किमान समान ककार्यक्रमामध्ये अशाप्रकारे शहरांचे नाव बदलण्याचे ठरलेले नाही.नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही. नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करून काही होत नाही. काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरून आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चित आमचा विरोध राहणार, असे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या त्या वेळच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, असा नवा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येईल. केंद्राच्या मंजुरीनंतर नव्या नावावर शिक्कामोर्तब होईल. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला एमआयएमचा विरोध आहे.