किनार्यावर येऊन आदळणार्या लाटांचा तडाखा तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला बसला आहे.
वार्याच्या वेगाने इमारतीही कोसळल्या; आपत्ती निवारण दलाची नियुक्तीमुंबई/नवी दिल्ली, दि. १५ मे : तौक्ते चक्रीवादळाने हळूहळू रौद्ररुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्यात दक्षिण पूर्ण अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण झाले. आता त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून, केरळ, तामिळनाडूमध्ये त्याचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांचे नुकसान झाले आहे. झाडे कोसळली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह दहा-बारा जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांची बैठक घेऊन दक्षतेचे आदेश दिले आहेत.केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये ’रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून, सध्या वार्याचा वेग प्रचंड वाढला आहे. कासरगोड जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात वार्याच्या वेगाने दुमजली इमारत कोसळताना दिसत आहे.किनार्यावर येऊन आदळणार्या लाटांचा तडाखा तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला बसला आहे. वलियाथुरा येथील 60 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचे नुकसान झाले आहे. समुद्राच्या लाटा आदळत असल्याने पुलाला तडे गेले आहेत. मागे काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलाचे नुकसान झालेले होते. पूल वाकला असून, त्यामुळे पुलाकडे जाणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. अरबी समुद्रात तयार झालेले आणि वेगाने घोंगावत असलेलं ’तौत्के’ चक्रीवादळ येत्या 12 तासांत अक्राळ-विक्राळ रुप धारण करू शकते, अशी धोक्याची सूचना हवामान विभागाने दिली. मंगळवारी (18 मे) सकाळपर्यंत हे वादळ गुजरातच्या तटाला धडक देण्याची शक्यता आहे.या चक्रीवादळामुळे भारतासमोर एक नवे आव्हान उभे केले. या आव्हानाला तोंड देण्यासाठी ’राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’ची 53 पथके तैनात करण्यात आल्या आहेत. ही पथके महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांत तैनात केली आहे. अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असून त्याप्रमाणे युद्धपातळीवर काम करण्यात यावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘तौक्ते’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे वेगवान वादळासह मुसळधार पावसाचा मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील वीजयंत्रणेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे महावितरणची यंत्रणा सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे.अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ कोकण किनारपट्टीवरून रविवारी गुजरातच्या दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सखल भागातील नागारिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यांतील ऑक्सिजन प्रकल्पाची विशेष काळजी घेतली जाणार आहे.रायगड जिल्ह्यात समुद्र किनार्यावरील 62 गावे, तर खाडी किनार्यांवरील 115 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज पडल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना ग्रामपंचायती, नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे बंद ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मच्छीमारांना मासेमारीसाठी जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्ग वाहतूक सुरळीत रहावी यासाठी महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाला आपत्ती निवारण यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ’तौत्के’ चक्रीवादळाच्या इशार्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी कोविड 19 लसीकरण मोहीम दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईत 15 मे आणि 16 मे रोजी लसीकरण मोहीम स्थगित राहणार आहे. अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत.भारतीय नौसेनाही सज्जमच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. तामिळनाडू आणि राजस्थानच्या काही भागांतही तौत्के चक्रीवादळानं मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका ध्यानात घेता नौसेनेचे जहाज विमान, हेलिकॉप्टर, डायव्हर आणि आपत्ती निवारण गट तयार आहे. अरबी समुद्रातील तौत्के या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोक नाही. ते महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली. महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा ‘निसर्ग’प्रमाणे थेट परिणाम जाणवणार नाही. केवळ मुंबई, पालघर, रायगड आणि कोकण परिसरात 16 तारखेला चक्रीवादळच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भुते यांनी सांगितले. किनारपट्टी भागात प्रभाव जाणवणारतौत्के चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नसले, तरी किनारपट्टीच्या भागात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे चक्रीवादळासंबधी गावोगाव जनजागृती सुरू आहे. मुंबई, कोकण आणि इतर भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हे महत्वाचे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.