यशपुष्प या त्यांच्या पुस्तकातील सौंदर्यस्थळे उलगडतांनाच त्यातील मौलिक आणि अर्थपूर्ण विचारधनाचे त्यांनी विस्तृत विवेचन केले.
दूरदर्शनवरील कार्यक्रमात गौरवमुंबई, दि. १६ मार्च : ‘सर्वार्थाने अर्थपूर्ण जीवन जगणारा आणि इतरांच्याही जीवनाला अर्थ देणारा बहुआयामी प्रतिमेचा मनोहर कोहिनूर हिरा’, अशा भावपूर्ण शब्दात डॉ. आशुतोष रारावीकर यांचा दूरदर्शनच्या कार्यक्रमात गौरव झाला. सह्याद्री वाहिनीवर नुकताच प्रसारित झालेला ‘यशस्वी जीवनाचा प्रवास उलगडतांना’ हा आशयघन कार्यक्रम अतिशय रंगला. डॉ. रारावीकर यांची संस्कृतप्रचुर रसाळ वाणी, दर्जेदार भाषा, तर्कशुद्ध विवेचन, विषयांची अभ्यासपूर्ण, प्रगल्भ व प्रभावी मांडणी, डॉ. मृण्मयी भजक यांचे ओघवत्या भाषेतील सूत्रसंचालन व दूरदर्शनच्या डॉ. आलोक खोब्रागडे यांची अप्रतिम निर्मिती यामुळे हा सोहळा भावस्पर्शी झाला. रारावीकरांच्या उदात्त अशा संस्कृत श्लोकाच्या सुमधुर गायनाने वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते. प्रेक्षकांकडून विचारलेल्या एका प्रश्नाला ‘झीरो सम गेम’ व ‘विन-विन सोल्युशन’ ही अर्थशास्त्रातील तत्वे मानवी जीवनाला कशी लागू पडतात हे डॉ. रारावीकर यांनी अतिशय कल्पकतेने सांगितले. ‘जीवनाला अर्थ देते ते अर्थशास्त्र, जीवन पूर्णत्वाला नेते ते पूर्णशास्त्र व दोन्हींचा संगम म्हणजे अर्थपूर्ण शास्त्र’ या त्यांच्या यशपुष्प ग्रंथातील गाजलेल्या विचाराने श्रोत्यांच्या अंत:करणाचा ठाव घेतला. त्यांच्या चेहेर्यावरील सात्विक भाव, अमोघ वक्तृत्व शैली व विचारांची तत्वनिष्ठ बैठक यामुळे कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. प्रारंभी डॉ. रारावीकर यांच्या अनेक क्षेत्रांमधल्या गरुडभरारीवर प्रकाशझोत टाकणारी ध्वनि-चित्रफीत सादर करण्यात आली. त्यात त्यांच्या आर्थिक व बँकिंग क्षेत्रातील बहुमोल कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला गेला. तसेच त्यांच्या लेखक, साहित्यकार, गायक, वक्ता, तत्वज्ञ, विचारवंत व शिक्षण क्षेत्रातील कामगिरी अशा बहुरंगी भूमिकांचा वेध घेण्यात आला. नंतर त्यांनी संवाद रुपात स्वत:च्या जीवन प्रवासातील यशाचे विविध पैलू उलगडून सांगितले व यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणारी मौल्यवान विचारसूत्रे आपल्या सुंदर भाषाशैलीत विशद केली. शरीरस्वास्थ्य, उपासना, प्रत्येक कामाशी आणि नात्याशी प्रमाणिकता, नि:स्वार्थ प्रेम, समतोल, संयम आणि दातृत्व हे यशाचे सात मंत्र त्यांनी सांगितले. यशपुष्प या त्यांच्या पुस्तकातील सौंदर्यस्थळे उलगडतांनाच त्यातील मौलिक आणि अर्थपूर्ण विचारधनाचे त्यांनी विस्तृत विवेचन केले. यशपुष्प हे पुस्तक म्हणजे माझ्या आई-दादांचे अजरामर स्मारक आहे असे ते म्हणाले. देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये योगदानाची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करतांनाच, अर्थशास्त्राचा उपयोग माणसाच्या कल्याणासाठी करण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. अध्यात्म, संगीत, संस्कृत अशा विविध विषयांवरही त्यांनी प्रभावी विचार व्यक्त केले. आई-वडील हे माझे कल्पवृक्ष होते, हे सांगतांना त्यांच्या भावना उत्कट झाल्या. कार्यक्रमाच्या समारोपात त्यांनी ‘आयुष्याच्या नंदनवनात यशाचं हास्यपुष्प सर्वांच्या चेहेर्यावर फुलावं’ हे अखिल मानवजातीसाठी पसायदान मागितले.