इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही-सी 51 आणि पीएसएलव्हीचे हे 53वे मिशन आहे.
श्रीहरिकोटा, दि. १ मार्च : रविवारी सकाळी इस्रो या अंतराळ संस्थेच्या पीएसएलवी-सी 51 ने एकूण 18 सॅटेलाइट प्रक्षेपित केले. या अभियानांतर्गत ब्राझिलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइटचेही प्रक्षेपण केले. विशेष म्हणजे इस्रोने या उपग्रहासोबत भगवदगीतेची एक इलेक्ट्रॉनिक प्रतही अंतराळात पाठवली आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही-सी 51 आणि पीएसएलव्हीचे हे 53वे मिशन आहे. चेन्नईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटाहून हे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. या उड्डाणाचे शनिवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांपासूनच काऊंटडाऊन सुरू झाले होते. भारताने आज अंतराळात पाठवलेल्या अॅमेझोनिया-1द्वारे पृथ्वीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. अॅमेझोनिया उपग्रह ब्राझीलने तयार केला असून प्रक्षेपणाानंतर चीन आणि ब्राझील त्याचे संयुक्तपणे संचालन करणार आहेत. या मिशनचा कालावधी तीन वर्षाचा आहे. अमेझोनिया-1 द्वारे पृथ्वीवरील जंगलतोड आणि त्याचे निरीक्षण केले जाईल. अमेझॉनच्या जंगलात नुकतीच आग लागली होती. त्यामुळे ब्राझीलचा हा उपग्रह जंगलाच्या संवर्धनासाठी संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या उपग्रहातून येणार्या फोटोंमुळे वनस्पती आणि कृषी क्षेत्राला मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्पेस किड्ज इंडियाने सतीश धवन उपग्रहावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे उपग्रहासोबत मोदींचा फोटोही अंतराळात पृथ्वीभोवती फिरताना दिसणार आहे.