IMG-LOGO
महाराष्ट्र

काँग्रेसचे नेते चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Tuesday, Mar 16
IMG

मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पी. सी. चाको यांनी आपला निर्णय पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला.

तिरूअनंतपूरम, दि. १६ मार्च :  पक्षामध्ये गटबाजी सुरू असून काँग्रेसमध्ये काम करणे आता अवघड झाले आहे, असे म्हणत बाहेर पडलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पी. सी. चाको राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. केरळ विधानसभा निवडणुकांसाठी महिन्याभरात मतदान होणार असून चाको हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच पर्यायाने डावेप्रणीत लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये दाखल झाल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेससमोर चाकोंना समजून रणनीती आखण्याचे आव्हान असणार आहे. मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पी. सी. चाको यांनी आपला निर्णय पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना चाको यांनी आपण पुन्हा एलडीएफचे घटक झालो असल्याचे सांगितले. मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा केरळमध्ये एलडीएफचाच घटकपक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी एलडीएफचा घटक झालो आहे, असे ते म्हणाले. चाको यांच्या दृष्टीने मंगळवारचा दिवस घडामोडींचा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे की माकपमध्ये जावे, हे अंतिम क्षणापर्यंत त्यांनी निश्‍चित केलेले नसल्याचे त्यांच्या सकाळच्या विधानावरून दिसून येत होते. मी शरद पवारांची भेट घेणार आहे. पक्षाला ज्या काही संकटातून जावे लागत आहे, त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. मी सीताराम येचुरी आणि गुलाम नबी आझाद यांनादेखील भेटणार आहे. त्यानंतर पुढचे पाऊल काय असावे, हे ठरवेन. मला एलडीएफला माझा पाठिंबा द्यायला हवा पवारसाहेबांची भेट घेतल्यानंतर पक्षप्रवेशाविषयी मी ठरवेन, असे चाको म्हणाले होते.

Share: