मूळचे नेवासे तालुक्यातील असलेल्या दिलीप गांधी यांनी नगरमध्ये ज्यूसची गाडी सुरू करून व्यवसायाला सुरुवात केली होती. हातगाडी व्यावसायिकांचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
नगरला आज अंत्यसंस्कार, शहर भाजप शोकाकुलअहमदनगर, दि. १७ मार्च : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते दिलीप गांधी (वय 69) यांचे बुधवारी (17 मार्च) पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (18 मार्च) सायंकाळी चार वाजता नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे पत्नी सरोज गांधी, मुलगा माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी व देवेंद्र गांधी, मुलगी स्मिता नवसारीकर, जावई स्वानंद नवसारीकर, भाऊ अशोक गांधी व अनिल गांधी, सून मिताली गांधी व प्रगती गांधी असा परिवार आहे. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे आठ महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले आहे व त्यानंतर गांधी यांचेही कोरोनाने निधन झाल्याने अल्पसंख्याक समाजातील दोन प्रसिद्ध राजकारणी कोरोनाने नगरकरांपासून हिरावून नेले आहेत. गांधी यांच्या निधनाने शहर भाजपवर शोककळा पसरली आहे. नगरचे तीन वेळा खासदार राहिलेल्या गांधी यांनी नगरच्या प्रसिद्ध नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. तत्कालीन नगरपालिकेत नगरसेवक व उपनगराध्यक्ष अशी पदे भूषविलेल्या गांधी यांना 2019मध्ये खासदारकीचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर नगर अर्बन बँकेवरील त्यांचे संचालक मंडळही बरखास्त होऊन प्रशासक नियुक्ती झाली होती. तसेच गांधी यांचे भाजप शहर जिल्हाध्यक्षपदही गेले होते. त्यामुळे राजकीय जीवनात काहीशा एकाकी पडलेल्या गांधींचे राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यासाठी ते दिल्लीत होते; पण तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाली. तेथील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन गोयल यांनीही संबंधित रुग्णालयाला गांधी यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपचार सुरू होते; पण ते सुरू असतानाच बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे नेवासे तालुक्यातील असलेल्या दिलीप गांधी यांनी नगरमध्ये ज्यूसची गाडी सुरू करून व्यवसायाला सुरुवात केली होती. हातगाडी व्यावसायिकांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. हातगाडीवाल्यांकडून हप्ते मागणार्या पोलिसाला पकडून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावल्याने एका रात्रीत ते नगरमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर नगरच्या समाजकारणात त्यांनी भाग घेतला. नगरचे माजी नगराध्यक्ष व अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचा नगरपालिका निवडणुकीत पराभव करून त्यांनी इतिहास घडवला. त्यानंतर नगरसेवक, उपनगराध्यक्ष, 1999 आणि 2009 व 2014 अशी तीन वेळा नगरची खासदारकी त्यांनी भूषवली. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. हिंद सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदासह नगर अर्बन बँकेचे अध्यक्षपदही भूषवले. ते वाजपेयींच्या मंत्रीमंडळात मंत्री असताना हिंद सेवा मंडळात त्यांचा पराभव झाला होता. नगर अर्बन बँकेमुळे त्यांची बदनामी झाली होती व बँकही अडचणीत आली होती. धाडसी नेता म्हणून दिलीप गांधी परिचित होते. परिणामाची त्यांना चिंता नव्हती ते निर्णय घेऊन मोकळे व्हायचे. 2003ला वाजपेयी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील त्यावेळचेे भाजप नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांना डावलून समावेश झाल्याने 2004 ला गांधींचे तिकीट कापले होते; पण त्यांनी पक्ष निष्ठा ठेवली. पुढे 2009 व 2014 ला त्यांना पुन्हा तिकीट मिळून ते खासदार झाले. नगरचा उड्डाणपूल गांधीमुळेदिल्लीतील भाजपच्या राजकारणात नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्या दिलीप गांधी यांनी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गाच्या कामात नगरच्या स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचा समावेश करून घेतला. सध्या या पुलाचे काम सुरू आहे. खासदारकीच्या माध्यमातून नगरकरांसाठी त्यांनी हे मोठे विकास काम केले आहे.मोदी-शहांनी वाहिली श्रद्धांजलीगांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रात भाजपला बळकट करण्यात गांधी यांनी असंख्य प्रयत्न केले, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. गांधी यांनी संपूर्ण जीवन जनतेची सेवा करण्यासाठी समर्पित केले, अशा शब्दांत शाह यांनी भावना व्यक्त केल्या. गडकरी यांनी गांधी यांना श्रद्धांजली वाहताना माझ्या सदभावना गांधी यांच्या कुटुंबीयांसमवेत असल्याची भावना व्यक्त केली.पक्षाची मोठी हानी-प्रा. बेरडगांधी यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्यातील भाजपाची मोठी हानी झाली आहे. पक्षाशी एकनिष्ठ असणारा व अहमदनगर जिल्ह्यात पक्षाला एक नंबरचे स्थान मिळवून देण्यासाठी सतत झटणारा व कार्यकर्त्याशी सतत संपर्कात असणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी श्रद्धांजली अर्पण केली. एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांचा होता, असे ते म्हणाले.