IMG-LOGO
राष्ट्रीय

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढणार

Tuesday, Feb 23
IMG

कोरोनाच्या संकटातून सावरत असताना कच्च्या तेलाचा वापर वाढला आहे. यावर्षी जुलै पर्यंत कच्च्या तेलाचा वापर कोविडपूर्व पातळीवर जाईल.

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी :  देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. बहुतांश राज्यांमध्ये प्रथमच पेट्रोलची किंमत शंभर रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढणार असल्याने येत्या काही दिवसांत ही किंमत कमी होण्याची शक्यता नाही. कोरोनाच्या संकटातून सावरत असताना कच्च्या तेलाचा वापर वाढला आहे. यावर्षी जुलै पर्यंत कच्च्या तेलाचा वापर कोविडपूर्व पातळीवर जाईल. कारण कोरोना प्रकरणात घट झाल्याने औद्योगिक क्रियाकलाप सातत्याने वाढत आहेत. तेल उत्पादक गट ओपेक आणि इराणद्वारे तेल उत्पादनात घट सुरू आहे. अशा परिस्थितीत, कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप दहा डॉलरने वाढू शकतात. तीन महिन्यांत कच्चे तेल प्रतिपिंप 70 ते 75 डाॅलर होण्याची शक्यता आहे.  सोमवारी सकाळी कच्चे तेल प्रतिपिंप 63.11 डाॅलर होते. गोल्डमॅन सॅक्सच्या मते, यावर्षी कच्च्या तेलाच्या किंमतीत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, अमेरिकी सरकार इराणला अलीकडे तेल उत्पादनात वाढ करण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढतील. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही रविवारी सांगितले, की इंधन दरवाढीची दोन मुख्य कारणे आहेत. प्रथम, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे उत्पादन कमी झाले आहे आणि दुसरे म्हणजे उत्पादक देश जास्त नफा मिळवण्यासाठी कमी इंधन तयार करतात. यामुळे ग्राहक देशांना अडचणी येत आहेत.

Share: