IMG-LOGO
मुंबई

कशी आणि का झाली मनसुख हिरेनची हत्या?

Tuesday, Mar 23
IMG

हिरेन खून प्रकरणात निलंबित हवालदार विनायक बाळासाहेब शिंदे ( 51) आणि क्रिकेट बुकी नरेश रमणिकलाल गोरे (31) यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई, दि. २३ मार्च :   प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणातील गूढ दहशतवाद विरोधी पथकाने उलगडले आहे. या पथकाने दोघांना अटक केली असून हिरेन यांची हत्या का झाली आणि त्यांना कसे मारले, याचा तपशील प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे जाण्याअगोदरच बाहेर आले आहेत. असे असले, तरी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवलेली गाडी का उभी केली,  हे गूढ मात्र कायम आहे. न्यायलयाने अटक केलेल्या दोघांना 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. सचिन वाझे हेच या कटाचा मुख्य सूत्रधार आहेत.हिरेन खून प्रकरणात निलंबित हवालदार विनायक बाळासाहेब शिंदे ( 51) आणि क्रिकेट बुकी नरेश रमणिकलाल गोरे (31) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी गुप्तवार्ता विभागाचे निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह मनसुखच्या हत्येमध्ये सामील होते. मनसुखची पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरून एटीएसने खुनाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र मनसुखची हत्या झाली, तेव्हा वाझे घटनास्थळी नव्हते, असेही तपासात उघड झाले आहे. या हत्येमध्ये अजून काही लोकांचा सहभाग असल्याचा पुरावा एटीएसलाही मिळाला आहे, त्यातील काही पोलिस असू शकतात. त्यामुळे लवकरच या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली जाऊ शकते. स्फोटांनी भरलेल्या स्कॉर्पिओला अंबानीच्या घराबाहेर पार्क करण्याचा कट वाझे यांनी रचला होता. मनसुख हा या कटातील मुख्य साक्षीदार होता. या संपूर्ण कटात मनसुख यांनीही वाझे यांना मदत केली. जेव्हा या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला, तेव्हा हे रहस्य उघडण्याच्या भीतीने वाझे यांनी आणखी एक कारस्थान रचले. त्याने मनसुखला ठार मारण्याची योजना आखली. विनायक शिंदे यांच्यामार्फत चार मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता मनसुख यांना बोलावण्यात आले. पाच  मार्च रोजी मनसुखचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदर येथे असलेल्या खाडीमध्ये सापडला. मनसुखच्या तोंडाला आणि हातांना बांधून खाडीत जिवंत फेकण्यात आले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने मनसुख प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपवल्याच्या काही तासातच एटीएसने दोन जणांना अटक करून प्रकरण सोडवल्याचा दावा केला. वाझे यांनी आपल्या कटामध्ये मनसुखला सामील केले होते. याचे पुरावे एटीएस आणि एनआयएला सापडले होते; मात्र जोपर्यंत एटीएस वाझे यांची चौकशी करत नाही, तोपर्यंत ते या गोष्टीची पुष्टी करु सकत नाही. हिरेन हे भीतीमुळे वाझे यांच्यासोबत होते, की स्वतःच्या मर्जीने होते हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या दोघांमधील संपर्काचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत. मनसुखचे वकील आणि त्यांच्या कुटुंबाचा जबाबही या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा आहे. मनसुखने 18 फेब्रुवारी रोजी विक्रोळी पोलिस ठाण्यात आपली स्कॉर्पिओ चोरीची तक्रार दाखल केली होती. स्कॉर्पिओ अजिबात चोरीला गेली नसल्याचे एनआयएच्या फॉरेन्सिक तपासणीत समोर आले आहे. वाझे यांच्या कटात मनसुख व्यतिरिक्त गुप्तवार्ता विभागाच्या इतर दोन लोकांचा हात असल्याचा संशय आहे. वाझे यांच्या विनंतीवरूनच मनसुख यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याचेही उघड झाले आहे.

Share: