IMG-LOGO
मुंबई

किसान सभेचा मोर्चा मुंबईत दाखल

Monday, Jan 25
IMG

नाशिकच्या ईदगाह मैदानापासून निघालेला किसान सभेचा मोर्चा आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात पोहचला. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झाले.

मुंबई, दि. २५ जानेवारी : अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानापासून निघालेला किसान सभेचा मोर्चा आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात पोहचला. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झाले. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून हजारो शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात पोलिस प्रशासनाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकड्या मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोन कॅमे-यांचादेखील वापर करण्यात आला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. या वेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेने कूच करणार आहे.

Share: