IMG-LOGO
राष्ट्रीय

5G साठी मोठ्या गुंतवणुकीची गरज

Thursday, May 13
IMG

सध्याच्या कठीण परिस्थितीत एवढी गुंतवणूक होण्याची शक्यता दिसत नाही.

मुंबई, दि. १३  मे :  देशात फाइव्ह जी सेवेसाठी सर्वसामान्य ग्राहकांना थोडी जास्त वाट पाहावी लागणार आहे. संपूर्ण देशात फाइव्ह जी दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना एक लाख तीस हजार कोटी रुपये ते दोन लाख तीस हजार कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.सध्याच्या कठीण परिस्थितीत एवढी गुंतवणूक होण्याची शक्यता दिसत नाही. अशा स्थितीत तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, निवडक सर्कलमध्ये काही विशेष सेवांसाठीच फाइव्ह जी सुविधा मिळेल. इतर लोकांना हळूहळू ही सुविधा पोहोचेल. वित्तीय संस्था मोतीलाल ओसवालच्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, फाइव्ह जीमध्ये तीन प्रमुख गुंतवणुकी आहेत. प्रथम स्पेक्ट्रम, दुसरी साइट आणि तिसरी फायबर. संपूर्ण देशात फाइव्ह जी नेटवर्क लावण्याची गुंतवणूक लो बँड स्पेक्ट्रमवर एक लाख तीस हजार कोटी रुपये आणि मिड बँड स्पेक्ट्रमवर दोन लाख तीस हजार कोटी रुपये असेल. वित्त वर्ष 2023 पासून फाइव्ह जी सुरू होईल, असे गृहीत धरले, तरीही येत्या चार-पाच वर्षांत आणखी गुंतवणूक करावी लागेल. दूरसंचार कंपन्यांची वित्तीय स्थिती आणि प्रति ग्राहक सरासरी महसुलाचा कमी दर पाहता गुंतवणूक खूप कठीण वाटते. अशा स्थितीत संपूर्ण देशात फाइव्ह जी सेवा सुरू करण्याऐवजी या कंपन्या काही सर्कलमध्ये स्पेक्ट्रम घेऊन इंटरनेट ऑफ थिंग्ज ऑपरेशनसारख्या सेवांची सुविधा सुरू करतील.इतिहासात डोकावल्यास भारत तंत्रज्ञान अपडेट करण्यात विकसित देशांपेक्षा दहा वर्षे मागे आहे; मात्र फोरजीत हे अंतर घटून चार वर्षे राहिले होते. कारण तेव्हा ’जिओ’ने संपूर्ण ताकदीने इकोसिस्टिम अपडेट केली होती; मात्र भारताच्या दूरसंचार बाजारात कोणताही नवा खेळाडू उतरण्याची शक्यता नाही. जगातील 26 देशांमध्ये फाइव्ह जीचे व्यावसायिक लाँचिंग झाले आहे; मात्र आतापर्यंत याचे केवळ एक कोटी ग्राहक आहेत. वित्त वर्ष 2025 पर्यंत ग्राहक संख्या वाढून 280 कोटी होईल, असा अंदाज आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि चीन फाइव्ह जीच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत.  फाईव्ह जी ची सेवा दोन स्पेक्ट्रमवर अवलंबून असेल. तिची किंमत सुमारे 328 अब्ज रुपये आहे. देशात फाईव्ह जी मोबाइल नेटवर्कची चाचणी सुरू होत आहे. सरकारने यासाठी 13 अर्ज स्वीकारले आहेत. यासाठी दूरसंचार कंपन्यांना काही अटींसह या आठवड्यात 700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम जारी केले जातील. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, हुवेई आणि झेडटीईसह चीनची कोणतीही कंपनी या चाचणीत भाग घेणार नाही. कारण, सर्व कंपन्यांकडे आपले फाइव्ह जी तंत्रज्ञान नाही. परिणामी त्या नव्या पिढीच्या मोबाइल नेटवर्कच्या चाचणीसाठी एकमेकांशी भागीदारी करत आहेत. बीएसएनएलने यासाठी सीडॉट आणि भारती एअरटेलसोबत भागीदारी केली आहे. व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओने अन्य व्हेंडर्ससोबत भागीदारी केली आहे. त्यात एरिक्सन आणि नोकियाचा समावेश आहे.  फाईव्ह जी मुळे कारखान्यांना पुरवठा आणि ग्राहकांसोबत रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी मिळेल. या तंत्रज्ञानाने भारतात डिजिटल क्रांतीचा वेग वाढेल. स्मार्ट सिटी, व्हर्च्युअल बँकिंग आणि रिमोट मेडिसिनसारख्या संकल्पना वास्तवात येणे सोपे होईल. फोरके आणि ऐटकेसारखे स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन आणि बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स वाढेल.34 देशांच्या 378 शहरांत फाइव्ह जी नेटवर्क उपलब्ध आहे आणि त्यांची संख्या सलग वाढत आहे. सध्या दक्षिण कोरियात सर्वाधिक 85 शहरांत फाईव्ह जी नेटवर्क आहे. चीनच्या 57 शहरांत, अमेरिकेच्या 50 शहरांत आणि ब्रिटनच्या 31 शहरांत फाईव्ह जी नेटवर्क आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत बहुचर्चित ‘’ तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होण्याची शक्यता असून, दूरसंचार विभागाकडे 16 अर्ज दाखल झाले आहेत. चाचणीसाठी स्वदेशी आणि आयात तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाणार असल्याचे दूरसंचार विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. अमेरिकी कंपनी ‘क्वालकॉम’सह ‘रिलायन्स जिओ’ने अमेरिकेत ‘फाइव्ह जी’ सेवेची यशस्वी चाचणी घेतली आहे. ‘जिओ’चे अध्यक्ष मॅथ्यू ओमान यांनी दिलेल्या माहितीनुसार क्वालकॉम आणि ‘रिलायन्स’ची उपकंपनी ‘रेडिसीस’ ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानावर काम करीत असून, लवकरच ही सेवा सादर करण्यात येणार आहे. जिओ आणि क्वालकॉमने जाहीर केल्यानुसार फाइव्ह जीएनआर सोल्युशन्स’ आणि ‘क्वालकॉम फाइव्ह जी आरएएन’ प्लॅटफॉर्मवर एक जीबीपीएसपेक्षा अधिक वेग प्राप्त करण्यात यश आले आहे. सध्या अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रोलिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी आदी देशांतील ग्राहकांना एक जीबीपीएस वेगाने इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आहे. भारतात ‘फाइव्ह जी’ सेवेच्या चाचणीला मुहूर्त लागला नसला तरी, जगभरातील 68 देशांमध्ये यापूर्वीच ही सेवा सुरू झाली आहे. ही सेवा श्रीलंका, ओमान, फिलिपिन्स आणि न्यूझीलंडसारख्या छोटे देशांतही सुरू झाली आहे. ‘फोर जी’च्या तुलनेत ‘फाइव्ह जी’ सेवेचा वेग कैकपटीने अधिक आहे. इंटरनेट सेवेचा वेग मोजणार्‍या ‘ओपनसिग्नल’ने नुकतीच ‘फाइव्ह जी’ नेटवर्कशी संबंधित अहवाल सादर केला. त्यानुसार जगातील सर्वाधिक वेगवान ‘फाइव्ह जी’ सौदी अरेबियामध्ये कार्यरत आहे. तेथील ‘फाइव्ह जी’ नेटवर्कचा सरासरी डाउनलोडचा वेग 377.2 एमबीपीएस आहे. तेथे ‘फोर जी’चा डाउनलोड वेग 30.1 एमबीपीएस असून, ‘फाइव्ह जी’च्या तुलनेत 12.5 पट कमी आहे. ‘रिलायन्स जिओ’ने भारतात ‘फाइव्ह जी’ नेटवर्कवर एक जीबीपीएस वेग देण्याची घोषणा केली आहे.

Share: