IMG-LOGO
महाराष्ट्र

उद्यापासून सुरू होणार राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

Sunday, Dec 13
IMG

विधिमंडळ अधिवेशनाला कोरोनाचा फटका बसला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू असताना कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला त्यामुळे हे अधिवेशन गुंडाळावे लागले होते.

मुंबई, दि. १३ डिसेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत पार पडणार आहे. तसेच फक्त दोन दिवसच कामकाज होईल. पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरिता हे अधिवेशन होत असले तरी विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची संधी सोडणार नाहीत.विधिमंडळ अधिवेशनाला कोरोनाचा फटका बसला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू असताना कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला त्यामुळे हे अधिवेशन गुंडाळावे लागले होते. पावसाळी अधिवेशनही लांबले व ते सप्टेंबरमध्ये घेण्यात आले. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाचे सावट लक्षात घेता, मुंबईतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कामकाज सल्‍लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे अधिवेशनही ७ डिसेंबरला घेण्यात येणार होते. मात्र, आता १४ आणि १५ डिसेंबर असे २ दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात महिला, बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे. सध्या मराठा आरक्षणाचा विषय सध्या गाजत आहे. हा मुद्दा विरोधक उपस्थित करणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भाजपची कोंडी करण्याकरिता कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कृषी कायदांचा मुद्दा तापविण्याची शक्‍यता आहे.दरम्यान, यंदाचे अधिवेशन हे फक्त २ दिवसाचे असल्याने राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असणाऱ्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. 'हिवाळी अधिवेशन दोनच दिवस घेतल्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकत आहे', असे भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्ट केले आहे.

Share: