IMG-LOGO
महाराष्ट्र

महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत पोषक वातावरण

Friday, Dec 25
IMG

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते.

गुप्तचर विभागाचा अहवाल; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुंबई, दि. २५ डिसेंबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचा महत्त्वपूर्ण अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. राज्याच्या गुप्तचर विभाग यंत्रणेने हा अहवाल दिल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी विजयी पताका लावण्याची शक्यता आहे. विधान परिषदेप्रमाणेच आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे. गुप्तचर खात्याने राज्य सरकारकडे अहवाल सुपूर्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सरकारचा विश्वास दुणावला आहे. राज्यातील पाच महापालिका आणि तब्बल 96 नगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या महापालिका-नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही याचा पुनरुच्चार केला; मात्र काँग्रेकडून मुंबई महापालिकेबाबत अद्याप स्पष्टोक्ती नाही. काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आजच स्वबळाचा सूर पुन्हा आळवला. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास झेंडा फडकावणे कठीण जाणार नाही. जानेवारी महिन्यात राज्यातील 14 हजार 232 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होईल, तर 18 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या निवडणुकीतील कामागिरीची पुनरावृत्ती करायचे ठरवले आहे, तर भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनसेच्या पदाधिकार्‍यांना ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण सामर्थ्याने लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

Share: