मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.
महेश कोठे यांच्या हाती बाणाऐवजी घड्याळ; सोलापुरातील घटनामुंबई, दि. ८ जानेवारी : सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती; मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच उपस्थितीत कोठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. त्यानंतर कोठे यांनी आज पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांनीच ट्वीट करत कोठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची माहिती दिली. कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. कोठे यांच्या निकटवर्तीय समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवाद काँग्रेसमध्ये प्रवेश केला.रियाज मुमीन, माजी नगरसेवक राज महेंद्र कमकम, युवराज चुंबडकर, सलाम शेख, युवराज सर्वडे, नितीन करवा, शाम पांचारिया, बाजू जमादार, परशुराम भिसे यांनी कोठे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे एकत्र सत्तेत असून एकमेकांचे कार्यकर्ते फोडल्यास त्याचा वाईट संदेश जनतेत जाईल. त्यामुळे तिन्ही पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून असे पक्षप्रवेश रोखण्यात यावे, अशी सूचना शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे कोठे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता.