IMG-LOGO
महाराष्ट्र

महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार?

Monday, Mar 01
IMG

नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आदी महापालिकांच्या निवडणुकांची तयारी केली आहे. सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या.

मुंबई, दि. १ मार्च : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारकडून ज्या महापालिकांवर प्रशासक नियुक्त केले आहेत, त्यांना 30 एप्रिलपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आदी महापालिकांच्या निवडणुकांची तयारी केली आहे. सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. गेल्या वर्षी मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक जानेवारीत होणार होती; मात्र कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्याकाळात दोनदा प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2021 मध्ये काही महापालिकांच्या प्रारूप याद्या तयार करण्यास सांगितल्या. पुन्हा त्या रद्द करून नव्याने हरकती, सूचना द्या अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार हरकती नव्याने मागवल्या. आक्षेप, नोंदींची खातरजमा करण्यासाठी महापालिकांनी थेट एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागात राहण्यास गेलेल्या मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. मतदार पळवल्याचे आरोप राजकीय व्यासपीठावर होऊ लागले आहेत. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी पुढील आदेश मिळेपर्यंत जाहीर करू नये, असे निर्देश महापालिका प्रशासकांना दिले आहेत. यावरून निवडणूका लांबणीवर पडल्याचे संकेत मिळत होते. या घडामोडी सुरू असताना आता राज्य सरकारकडून प्रशासकांना 31 एप्रिलपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  यामुळे महापालिका निवडणूका लांबणीवर जाण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.  दुसरीकडे बाशिंग बांधून आखाड्यात उतरलेले संभाव्य उमेदवारांच्या दररोजच्या खर्चात वाढ होऊ लागला आहे. प्रत्येक उमेदवार निवडणुकीत सुमारे 10 ते 50 लाखांपर्यंत खर्च करतो. निवडणूकच लांबणीवर पडल्यास खर्च वाढवण्याच्या भीतीने उमेदवारांना चांगलाच घाम फुटला आहे. जनसंपर्क कार्यालयाचे भाडे, फोन, वीजबील, जाहीर कार्यक्रम यांचा ही खर्च वाढणार आहे. प्रभागातील खर्च हा सुरूच असून त्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न आता संभाव्य उमेदवारांकडून केला जात आहे.

Share: