IMG-LOGO
महाराष्ट्र

नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक एक तारखेला बंद

Friday, Dec 25
IMG

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात; पण कोरोनामुळे लोकांनी यंदा घरातूनच अभिवादन करावे.

पुणे, दि. २५ डिसेंबर : कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वत्र खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहे. अशात गर्दी टाळण्यासाठी एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याधिका-यांनी तसे आदेश काढले आहेत.  कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात; पण कोरोनामुळे लोकांनी यंदा घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानंतर आता एक जानेवारी रोजी पुणे-नगर महामार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना प्रादूर्भावाच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. लोकशासन संवादतर्फे ही सांस्कृतिक परिषद घेण्यात येणार होती. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. कोळसे यांनी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली, तरी परिषद घेणारच असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर आता ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे एक जानेवारी रोजी दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे; मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

Share: