अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाचे 1995 सालापासून पाडवी प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपने अनेकदा या मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई, दि. १५ फेब्रुवारी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्यानंतर आता राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या खात्यात असल्याने त्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसचाच चेहरा पाहायला मिळेल असे बोलले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.पाडवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेतील कामकाजाचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे पाडवी यांचे नाव काँग्रेसकडून सुचवले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाडवी यांना याबाबत विचारण्यात आले असता राजकारणात अशा प्रकारच्या चर्चा होत असतात, असे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा आहे; पण या चर्चेआधी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही माझ्या नावाची चर्चा होती. त्यामुळे राजकारणात अशा चर्चा होतच असतात. अशा परिस्थितीत आपण न थांबता पक्षासाठी काम करत राहणे महत्वाचे आहे. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष देईल, ती जबाबदारी पार पाडणे हे माझे काम आहे, असे ते म्हणाले. अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाचे 1995 सालापासून पाडवी प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपने अनेकदा या मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आलेले नाही. 1995 मध्ये पाडवी यांनी अक्राणी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघाचे चित्र पालटले. तेव्हापासून या मतदारसंघात त्यांना कुणी पराभूत करू शकले नाही. पाडवी यांच्याकडे सध्या आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षातील ते एक अनुभवी नेते असून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाडवी यांच्याकडे काँग्रेसने आदिवासी विकास मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.