कायम लोकांमध्ये राहणारा अतिशय रांगडा नेता अशी भारत भालके यांची ओळख होती. डोक्यावर परिट घडीची पांढरी टोपी, पांढरा तीन गुंड्यांचा पैलवान शर्ट आणि विजार असा साधा पोशाख तसंच कायम दाढीत असणारे नाना यांची ग्रामीण बाजाची भाषा जनतेत खूप लोकप्रिय होती. बेधडक बोलणारा आमदार असा त्यांची ओळख असल्याने अधिकारी वर्गातही त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता.
पंढरपूर, दि. २८ नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात वयाच्या ६० वर्षात निधन झाले. भारत भालके यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.