IMG-LOGO
महाराष्ट्र

चोरांना पाहून पळणारे पोलिस निलंबित

Wednesday, Dec 30
IMG

औंध येथील शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. हवालदार प्रवीण गोरे आणि पोलिस नाईक अनिल अवघडे हे औंध येथे मार्शल म्हणून कर्तव्यास होते.

पुणे, दि. ३० डिसेंबर : औंध येथील शैलेश टॉवर येथे चोरटे शिरले असताना त्यांना पाहून घाबरून पळणारे पोलिस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि स्वत: जवळ रायफल असतानाही चोरट्यांना कोणताही प्रतिकार न करता चोरट्यांना पळून जाऊ देणारे पोलिस नाईक अनिल दत्तु अवघडे यांना पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी निलंबित केले आहे. चोरट्यांना पाहून पोलिस पळून गेल्याची शहरात चर्चा होती. शहर पोलिस दलाची बदनामी झाल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केले. त्यामुळे या दोघा पोलिस कर्मचार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे.  औंध येथील शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. हवालदार प्रवीण गोरे आणि पोलिस नाईक अनिल अवघडे हे औंध येथे मार्शल म्हणून कर्तव्यास होते. शैलेश टॉवर येथे सुरक्षारक्षकाला मारहाण करीत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलिस नियंत्रण कक्षाने ही माहिती या दोघा बीट मार्शलांना दिली. त्यानुसार हे मार्शल सव्वातीन वाजता त्या ठिकाणी पोहचले. त्या वेळी एसएलआर रायफल असणारे अवघडे मोटारसायकलवरून खाली उतरले. त्याचवेळी शैलेश टॉवरच्या आवारातून चार शस्त्रधारी चाकू, कटावणी व गज घेऊन या मार्शलच्या समोरून जाऊ लागले. ते पाहून मोटारसायकलवरील गोरे यांनी आपले सहकारी अवघडे यांना तेथेच सोडून मोटारसायकल वळवून पळून गेले. चोरट्यांपैकी एकाने अवघडे यांना मारण्याकरीता त्यांच्या हातातील कटावणी उगारली व दुसर्‍याने गाडी निकालो और इनको ठोक दो असे म्हणाला. इतर चोरट्यांच्या हातात चोरीचे सामान होते. अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असूनदेखील त्यांनी या चोरट्यांना अटकाव करण्याचा, पकडण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच चोरटे पळून गेल्यानंतरही त्यांचा पाठलाग केला नाही.या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला आपल्या वॉकी टॉकी अथवा मोबाईलवरुन दिली नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील रात्रगस्तीवरील अधिकारी व कर्मचा-यांना माहिती न मिळाल्याने चोरटे सुरक्षारक्षकाला मारहाण करून पोलिसासमक्ष पळून जाण्यास यशस्वी झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला होता. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमाणसात मलीन झाल्याने दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

Share: