IMG-LOGO
महाराष्ट्र

राज्यात टाळेबंदी वाढण्याची शक्यता

Saturday, May 08
IMG

राज्यात गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नवे रुग्ण आढळून आले होते.

मुंबई, दि. ७ मे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवी तशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.राज्यात गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी 50 हजारांच्यावरच राहिलेली आहे. त्यामुळे टाळेबंदीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हवे तसे कमी झालेले नाही. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे; पण परिस्थिती निवळलेली नाही. त्यामुळे निर्बंध काढून घेण्यात आले, तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. टाळेबंदीच्या निर्णयाबाबत 15 मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल, असे टोपे यांनी सांगितले. राज्य सरकार तिसर्‍या लाटेसाठीदेखील तयारी करत असल्याचे टोपे यांनी सांगितले. बेड्स वाढवणे, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर आणि इतर वैद्यकीय सुविधांमध्ये कशी वाढ करता येईल, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनेही सरकार प्रयत्नशील आहे, असे टोपे म्हणाले.

Share: