IMG-LOGO
राष्ट्रीय

मोहन भागवतांनाही मोदी ठरवतील दहशतवादी

Thursday, Dec 24
IMG

मोदी सरकारने शेतक-यांचे ऐकावे. गेल्या 29 दिवसांपासून शेतकरी थंडीत कुडकुडत आंदोलन करत आहेत. संपूर्ण देश हे पाहत आहेत.

राहुल गांधी याची टीका; कायदे रद्द करण्यासाठी शेतक-यांच्या वतीने निवेदननवी दिल्ली, दि. २४ डिसेंबर :  केवळ चारपाच उद्योगपतींसाठी काम करणारे हे सरकार आंदोलन करणा-या शेतक-यांना देशद्रोही ठरवत आहे. उद्या जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवले जाईल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी दोन कोटी शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देऊन कृषी कायदे मागे घेण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. शेतकरी त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाहीत. त्यांच्याविरोधात कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. कृषी कायदे मागे घेतले नाही, तर केवळ भाजपचे किंवा संघाचेच नुकसान होणार नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होणार आहे, असे ते म्हणाले. मोदींविरोधात जे कोणी उभे राहतात, त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. आज शेतकर्‍यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवले जाते आहे. उद्या मोहन भागवतही मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवले जाईल, अशी टीका राहुल यांनी केली. अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने शेतक-यांचे ऐकावे. गेल्या 29 दिवसांपासून शेतकरी थंडीत कुडकुडत आंदोलन करत आहेत. संपूर्ण देश हे पाहत आहेत. कृषी कायद्यांमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत हे शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.संयुक्त अधिवेशनाची मागणीसंसदेत कोणतीही चर्चा न करता कृषी कायदा मंजूर करण्यात आला आहे. हा कायदा करताना शेतक-यांशी साधी चर्चाही करण्यात आली नाही. शेतक-यांना हा कायदा मान्य नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ संयुक्त अधिवेशन घेऊन हा कायदा रद्द करावा, असे सांगतानाच सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास त्याविरोधात विद्रोह करावाच लागेल, असा इशाराही राहुल यांनी दिला.

Share: