IMG-LOGO
मुंबई

राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Thursday, Dec 24
IMG

मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनने विविध ठिकाणी लावलेले पोस्टर फाडले होते.

अ‍ॅमेझॉन-मनसेतील वाद चिघळला; पोस्टर फाडण्याचे प्रकारमुंबई, दि. २४ डिसेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉन यांच्यातील वाद चिघळला आहे. अ‍ॅमेझॉन न्यायालयात गेल्यानंतर मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या सचिवांना नोटीस पाठवली. या प्रकरणी पाच जानेवारीला राज यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी मनसे नेते अखिल चित्रे यांनासुद्धा 19 डिसेंबरला अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती.  मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनने विविध ठिकाणी लावलेले पोस्टर फाडले होते. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतल्याने हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि मनसे सचिवांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा असावी, अशी मनसेची मागणी आहे; मात्र मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास अ‍ॅमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मनसेने अ‍ॅमेझॉनविरोधात मोहीम सुरू केली. ’नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्‍चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावले. शिवाय याआधी अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही मनसेने पोस्टर झळकावले होते. त्यात भर म्हणून अ‍ॅमेझॉनने ठिकठिकाणी लावलेले पोस्टर्स मनसे कार्यकर्त्यांनी फाडले होते. याविरोधात अ‍ॅमेझॉनने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरे आणि सचिवांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  राज यांना पाठवलेल्या नोटिशीवर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून अ‍ॅमेझॉनला उत्तर दिले जाईल. महाराष्ट्रात व्यवसाय करत असल्याचे अ‍ॅमेझॉनने विसरू नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी आम्ही नक्कीच पाजणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.  अ‍ॅमेझॉनने खटले दाखल करण्याचा महाराष्ट्रात प्रयोग सुरू केला आहे. याआधी 19 डिसेंबरला मलाही नोटीस पाठवली होती. राज यांना नोटीस पाठवण्याचे जे दु:साहस केले आहे, त्याची किंमत येत्या काही दिवसांत नक्कीच मोजावी लागणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीसला आम्ही फारशी किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही प्रकारचे खटले अंगावर घेण्याची आमची तयारी आहे, हे अ‍ॅमेझॉनने लक्षात ठेवावे, असे चित्रे यांनी बजावले आहे.

Share: