इंधन दरवाढीमुळे येत्या काळात महागाईचा मोठा भडका उडणार असल्याचे अटळ मानले जात आहे. ताज्या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.
नवी दिल्ली, दि. १५ फेब्रुवारी : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराने 63 डॉलर्स प्रतिपिंपची पातळी ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्याकडून इंधन दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.तेल कंपन्यानी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पेट्रोल, डिझेल दरात प्रत्येकी 26 पैशांची वाढ केली तर विना अनुदानाच्या गॅस सिलेंडर दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ केली. या गॅस सिलेंडरचे दर 719 रुपयांवरून 769 रुपयांवर गेले आहेत. नवी दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. ताज्या इंधन दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 89 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यापासून सातत्याने इंधन दरात वाढ सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी दरवाढ कायम राहिली. देशातील अनेक शहरात आता पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या समीप पोहोचले आहेत.इंधन दरवाढीमुळे येत्या काळात महागाईचा मोठा भडका उडणार असल्याचे अटळ मानले जात आहे. ताज्या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. सोमवारी दिल्लीत पेट्रोलचे दर 88.99 रुपयांवर गेले, तर डिझेलचे लिटरचे दर 79.35 रुपयांवर गेले. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 95.46 रुपयांवर आणि डिझेलचे दर 86.34 रुपयांवर गेले आहेत. चेन्नईमध्ये हेच दर 91.19 आणि 84.44 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे पेट्रोल, डिझेलचे दर क्रमशः 90.25 आणि 82.94 रुपयांवर गेले आहेत. गेल्या एक वर्षात पेट्रोल दरात लीटरमागे 18 रुपयांची वाढ नोंदविण्यात आलेली आहे. ही तर जनतेची लूट : राहुल गांधीकाँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढण्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ’ही जनतेची लूट’ असल्याचे सांगतानाच राहुल गांधींनी हा केवळ ’दोन लोकांचा विकास’ असल्याचेही म्हटले आहे.