वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो त्यांनी स्वीकारला.
भाजप अजूही आक्रमक; आता मुंडेच्या राजीनाम्याची मागणी मुंबई, दि. १ मार्च : पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. राजीनामा स्वीकारू नये, तो राज्यपालांकडे पाठवू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव होता; परंतु विरोधकांबरोबरच स्वकीयांचीही साथ मिळत नसल्याने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. भाजपचे त्यामुळे समाधान झालेले नाही. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करावी, अशी मागणी करतानाच आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो त्यांनी स्वीकारला. ठाकरे यांनी उशिरा का होईना राठोड यांचा राजीनामा घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत तेच करायला हवे होते. त्यांनीही मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली पाटील यांनी एकीकडे ही मागणी केली असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुंडे यांचे प्रकरण वेगळेच असल्याचे सांगत भाजपमध्येच विसंवाद असल्याचे सिद्ध केले. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला; पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दबाव झुगारुन लावत राठोड यांचा राजीनामा घेतला. राठोड आपला राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले; मात्र जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती त्यांनी केली होती. राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली. राठोड यांनी आज सपत्निक वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला; पण हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी आपण पदावरुन दूर झाल्याचे राठोड यांनी पत्रकारांना सांगितले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून बंजारा समाजाची, पूजा चव्हाणची बदनामी झाली. गेल्या तीस वर्षांची माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त झाली. याला भाजपचे घाणेरडे राजकारण कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केला. राठोड यांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दालनात चर्चा झाली. त्या वेळी संजय राठोड यांचा राजीनामा आताच घेतला जाऊ नये. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असे मत शिंदे यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली; पण राठोड यांच्याबाबत आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. माध्यमांना मला उत्तरे द्यायची आहेत, विरोधी पक्षाला उत्तर द्यायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती मिळते आहे. ’पूजा चव्हाण प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. विरोधकांसोबतच स्वकीयांनीदेखील पक्षावर दबाव टाकला आहे. या प्रकरणाची पोलिस चौकशी सुरू आहे. अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे तूर्तास राजीनामा द्या. आपण लवकरच निर्णय घेऊ. आता राजीनामा द्या. निर्दोष असाल तर पुढे विचार करू,’ असं मुख्यमंत्र्यांनी वर्षावरील बैठकीत राठोड यांना सांगितले.बंजारा समाजाच्या भाजपविरोधी घोषणाराठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बंजारा समाजातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये बंजारा समाजातील काही लोक आणि राठोड यांचे समर्थक एकत्र आले आणि त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.वनमंत्रिपदावर काँग्रेसचा डोळाआता वनमंत्रिपदावरुन जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. वनमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून चार नावे समोर येत असतानाच आता काँग्रेसनेही वनमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केली आहे. वनमंत्रिपद आपल्याकडे घेऊन मदत आणि पुनर्वसन खाते शिवसेनेला सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खाते शिवसेनेला देण्याचा काँग्रेसचा मानस असल्याचे समजते.