IMG-LOGO
राष्ट्रीय

अर्ध्या तासात दीड लाख कोटींचा चुराडा

Saturday, Feb 27
IMG

अमेरिकेतील घडामोडी गुंतवणूकदारांच्या मनावर परिणाम करून गेल्या. त्यामुळे बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. शेअर निर्देशांकाची स्थिती दोलायमान झाली आहे.

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी  : जगभरातील भांडवली बाजारातील पडझडीचे पडसाद  शेअर बाजारावर उमटले.  शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स तब्बल एक हजार अंकांनी कोसळला. त्यानंतरही त्याचे कोसळणे सुरूच राहिले. संध्याकाळपर्यंत 1900 हून अधिक अंकाची पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 300 अंकांनी आपटला. अवघ्या तीस मिनिटांत झालेल्या पडझडीने बाजारात जवळपास दीड लाख कोटींचा चुराडा झाला.अमेरिकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे. भविष्यात महागाई आणखी वाढेल या भीतीने गुरुवारी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. यामुळे अमेरिकेतील सर्वच भांडवली बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. त्याचे पडसाद  शुक्रवारी आशियात उमटले. सिंगापूर, जपान, हाँगकाँग या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. भारतीय बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला.अमेरिकेतील घडामोडी गुंतवणूकदारांच्या मनावर परिणाम करून गेल्या. त्यामुळे बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. शेअर निर्देशांकाची स्थिती दोलायमान झाली आहे. आजच्या घसरणीमुळे चांगले शेअर कमी किमतीत खरेदी करण्याची गुंतवणूकदारांना संधी आहे. शुक्रवारच्या सत्रात जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांवर दबाव आहे. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 23 शेअर घसरले आहेत. ज्यात रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो, इन्फोसिस, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. चलन बाजारात डॉलरसमोर रुपयाची होरपळ झाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेतल्याने डॉलरची मागणी वाढली आहे. परिणामी रुपयात तब्बल 67 पैशांचे अवमूल्यन झाले आहे. रुपया सध्या 73.10 वर आहे. केंद्र सरकारकडून तिसर्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. यात विकासदर वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मात्र त्याआधीच बाजारात नफेखोरांनी नफावसुली सुरू केल्याचे बोलले जाते.

Share: