राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपकडून उदयनराजेंची निवड राज्यसभेवर करण्यात आली. तर संभाजीराजे छत्रपती यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे.
मुंबई, दि. २९ सप्टेंबर : शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा मिळेल, अशी थेट ऑफर देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. 'आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तरी आमदार निवडून येतो का? आठवले बोलत असतात. मार्गदर्शन करत असतात. त्यांना संसदेत आणि संसदेबाहेरही कोणी गांभीर्यानं घेत नाही,' असा टोला शरद पवारांनी लगावला. सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती तपास देऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. यावर भाष्य करताना शरद पवार यांनी सीबीआयवर सडकून टीका केली. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. भाजपकडून उदयनराजेंची निवड राज्यसभेवर करण्यात आली. तर संभाजीराजे छत्रपती यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे. पण ते राष्ट्रपती नियुक्त सदस्य असले, तरी त्यांचं नाव पंतप्रधानांकडून सुचवण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण प्रकरणात सहकार्य करावं,' असं आवाहन शरद पवारांनी केलं.