IMG-LOGO
महाराष्ट्र

वीजबिल वसुलीविरोधात राज्यभर आंदोलन

Saturday, Mar 13
IMG

राज्यातील शेतकर्‍यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

राजू शेट्टी यांची माहिती; 19 तारखेला रस्त्यावर उतरणारकोल्हापूर, दि. १३ मार्च  : सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 19 मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. सरकारकडून अचानक सक्ती केली जात आहे. सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे, असा सवाल त्यांनी केला. कोल्हापुरात सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली आहे. सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दोन मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्य जनतेचा जीव जातो, अशी टीका त्यांनी केली. ग्राहकांना वीजबिल भरायला एक महिन्याचा वेळ द्यायला हवा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. टाळेबंदी काळातील वीजबिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. 19 मार्चला महाराष्ट्रात पहिल्यांदा शेतकर्‍यांची आत्महत्या झाली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. 19 मार्चच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असे ते म्हणाले.  राज्यातील शेतकर्‍यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकर्‍याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. टाळेबंदी काळातील तीन महिन्यांचे घरगुती वीजबिल माफ करावे, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण; महाराष्ट्रातील एक कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही, ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. 

Share: