मागील वर्षीचे शिक्षण ऑनलाईन झाल्यानंतर परीक्षा न घेता सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आधी लसीकरण करण्याची शिक्षक परिषदेची मागणीनगर, दि. १३ मे : कोरोनाच्या अनुषंगाने कुटुंब सर्वेक्षण व अन्य कामे शिक्षकांवर सोपवण्यात आली असली, तरी आता या कामांवर बहिष्कार शिक्षकांनी टाकला आहे व आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. यातून, शिक्षकांचे आधी लसीकरण करा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक परिषदेने केली आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या लसीकरणाबाबतचे स्वयंस्पष्ट आदेश निघत नाहीत व शंभर टक्के शिक्षकांचे लसीकरण जोपर्यत होत नाही, तोपर्यंत शिक्षक परिषद आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत शिक्षकांनी कोविड संदर्भातील कोणतीही कामे करू नयेत, असे आवाहन परिषदेचे जिल्हाधक्ष प्रवीण ठुबे आणि विकास डावखरे यांनी केले आहे.मागील वर्षीचे शिक्षण ऑनलाईन झाल्यानंतर परीक्षा न घेता सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे; पण शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने कुटुंब सर्र्वेेक्षण व अन्य कामे शिक्षकांना दिली आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे जोपर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना कोविड संदर्भातील कोणतीही कामे देण्यात येऊ नयेत व प्राथमिक शिक्षकांना लसीकरणाबाबत तात्काळ आदेश निर्गमीत करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. प्रत्यक्ष आदेश निघेपर्यंत लसीकरणाबाबत पाठपुरावा परिषद सुरूच ठेवणार आहे, अशी माहिती ठुबे आणि डावखरे यांनी दिली.नगर जिल्ह्यातील 36 शिक्षक कोरोनामुळे बळी गेले असून जवळील पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण झालेले आहे; मात्र नगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने पुकारलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची दखल घेऊन शिक्षकांच्या लसीकरणाबाबत आवश्यक कार्यवाहीची सूचना विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे व शिक्षक परिषद संस्थापक आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे केली आहे. तसेच या संदर्भात ठुबे यांनी राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांना आंदोलनाबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनीदेखील आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना करून मार्ग काढण्याची मागणी केली आहे; मात्र प्रत्यक्ष आदेश निघेपर्यंत लसीकरणाबाबत पाठपुरावा प्राथमिक शिक्षक परिषद सुरूच ठेवणार आहे, अशी भूमिका ठुबे आणि डावखरे यांनी घेतली आहे. आ. तांबेंनी दिल्या सूचनाशिक्षकांच्या काम बहिष्कार आंदोलनासंदर्भात परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष आर. पी. राहाणे, संगमनेरचे गुरुमाऊली मंडळ अध्यक्ष संतोष भोर यांनी आ. डॉ. तांबे यांची संगमनेर येथे निवासस्थानी भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली. त्यानंतर डॉ. तांबे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांना फोन करून, जोपर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना कोविड संदर्भातील कामे देऊ नयेत व शिक्षकांच्या लसीकरणाबाबत तात्काळ आदेश निर्गमीत करावेत, अशा सूचना दिल्या.