IMG-LOGO
महाराष्ट्र

महावितरणकडे नवीन वीस लाख मीटर

Sunday, Mar 21
IMG

महावितरणकडून दरवर्षी सुमारे आठ ते नऊ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात.

मुंबई, दि. २१ मार्च  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना 18 लाख सिंगलफेज तर एक  लाख 70 हजार थ्रीफेज नवीन वीजमीटर पुरवठ्याच्या दिलेल्या कार्यादेशान्वये एक लाख 44 हजार 904 वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध झाले असून मार्च अखेरपर्यंत तीन लाख 80 हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे. महावितरणकडून दरवर्षी सुमारे आठ ते नऊ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च 2020 नंतर कोरोना प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे नवीन वीजमीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती, तरीही जून 2020 नंतर महावितरणतर्फे सहा लाख 50 हजार 523 सिंगलफेज तर 62 हजार 55 थ्रीफेज ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून उपलब्ध झालेले वीजमीटर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मुबलक वीज मीटरच्या उपलब्धतेसाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरची कमतरता जाणवणार नाही, यासाठी महावितरणतर्फे उपाययोजना करण्यात आलेली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेद्वारे सिंगल फेजचे 18 लाख आणि थ्री फेजचे एक लाख 70 हजार असे एकूण 19 लाख 70 हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याच्या आदेशाचा महावितरणमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. वीजमीटरच्या तुटवड्याअभावी वीजग्राहकांची गैरसोय होणार नाही, यासाठी निश्‍चित केलेल्या कालावधीनुसार वीजमीटरचा क्षेत्रीय कार्यालयांना नियमित पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश सिंघल यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकारी व पुरवठादारांना दिले आहेत.

Share: