कोरोना संकटामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आपण करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. चीननं १५ दिवसांमध्ये त्यांच्याकडे रुग्णालय उभारलं याचं सर्वांना कौतुक आहे.
मुंबई, दि. १५ डिसेंबर : उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नांना चोख उत्तर दिलं. यावेळी त्यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला. ‘देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवार यांची तर अशी इच्छा आहेच आहे,’ असं म्हणत टीका केली आहे. कोरोना संकटामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आपण करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. चीननं १५ दिवसांमध्ये त्यांच्याकडे रुग्णालय उभारलं याचं सर्वांना कौतुक आहे. पण मुंबईत १७ दिवसांत फिल्ड हॉस्पीटल उभारलं हे कौतुकास्पद नाही का?,” असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचा आम्ही एक कणही काढणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, राज्यात सध्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल. पण मागील वेळी आपण निर्णय घेतला होता, तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. उच्च न्यायालयात आपण केस जिंकलो. नंतर सर्वोच्च न्यायालयात आपण गेलो तेव्हा वकिलांची फौज तशीच्या तशी ठेवली आहे. सरकारनं भूमिकाही बदलली नाही. वेळोवेळी मराठा संघटनांसोबत चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकीलांबरोबर कायम चर्चा करत आहेत. सर्वानुमते ही लढाई आपण तिथे लढतो आहे. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही. ही लढाई जिंकावी, अशी माझी प्रार्थना आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, ही लढाई सुरू असताना ओबीसींचं आरक्षण काढणार का? हे मध्येच कुणाच्या सडक्या डोक्यातून निघालं माहीत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळे काय आहे? ही विकृतीच आहे, असे विकृत राजकारण आम्ही करत नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर पलटवार केला.