IMG-LOGO
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

Monday, Apr 05
IMG

शशिकला यांनी जवळपास शंभराहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

मुंबई, दि. ५ एप्रिल :  बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला (वय 88) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 70 च्या दशकात अनेक सिनेमांमधून शशिकला यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली होती. शशिकला यांनी जवळपास शंभराहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. सिनेमातील नायिकेच्या भूमिकेसोबतच खलनायिकेच्या भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. मूळच्या सोलापूरच्या असलेल्या शशिकला यांचे संपूर्ण नाव शशिकला जवळकर असे होतं. ओमप्रकाश सैगल यांच्याशी नंतर त्यांनी विवाह केला. शशिकला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती. शशिकला यांच्या वडिलांचे उद्योगात मोठे नुकसान झाल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब काम शोधण्यासाठी मुंबईत आले. या वेळी त्यांची भेट लोकप्रिय गायिका नूरजहाँ यांच्याशी झाली. नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या ‘झिनत’ या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्तामध्ये’ त्यांनी एक भूमिका साकारली. आरती, गूहराह, फूल और पत्थर यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. यानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका अधिक मिळू लागल्या. आरती आणि गुमरा सिनेमातीस भूमिकांसाठी तर त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. 2007 मध्ये सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Share: